कज्जा कचेरी एक वाचलेली गोष्ट आठवली. गोष्ट काका व पुतण्याची आहे. दोन भाऊ खेड्यातले. मोठा हुषार. शिक्षणाची आवड. शिकून मोठा अधिकारी होतो. शहरात नोकरी करतो. स्वतःचे घर बांधतो. लग्न करतो. योग्यवेळी सेवानिवृत्त होतो. त्याला एक मुलगा असतो. तो आता तरूण झालेला असतो. लहानपणापासून अधेमधे आईवडिलांबरोबर खेड्यात जात असतो. त्याचा काका त्याच्या वडिलांपेक्षा बराच लहान असतो. काकाचे शिक्षणात लक्ष नसते. वडील मात्र काकाने शिकावे म्हणून फार प्रयत्न करतात. पण काका शिक्षणापेक्षा शेतीत रमतो. वडिल शेतीसाठी होणारा खर्च त्याला पुरवीत असतात. म्हातारपणामुळे आईवडिलांचे निधन होते. मग मोठा भाऊच लहान भावाला पैसा पुरवीत असतो. त्याचे लग्नही करून देतो. लग्नानंतरही मोठा भाऊ लहान भावास पैसा पुरवीत असतो. हे सर्व मोठ्या भावाचा मुलगा पाहत असतो. ऐके दिवशी तो वडिलांना म्हणतो की, आता काकाला पैसे पाठविणे बंद करा. त्याचे वडिल कांही त्याचे ऐकत नाही. मग त्या दोघांमध्ये वादविवादाला सुरूवात होते. शेवटी कंटाळून वडिल त्याला वडिलोपार्जीत मिळकतीचे वाटण्यासंदर्भातील मुखत्यार पत्र देतात व मुलाला पाहिजे ते करण्याची मोकळीक देतात. मग हा मुलगा, काकांना वडिलोपार्जीत मिळकतीची वाटणी मागतो. पण काका त्याला स्पष्टपणे नकार देतो. मग मात्र पुतण्या काकांविरूद्ध न्यायालयात खटला दाखल करण्याची तयारी करतो. पुतण्याला शेतीची, घराची वाटणी करण्यासाठी मोजमाप घेणे, वेगवेगळे कागदपत्र जमा करण्यासाठी खेड्यात वारंवार जावे लागायचे. पहिल्यांदा तो जेंव्हा खेड्यात जातो, त्यावेळी गावात कुठे राहायचे हा प्रश्न त्याच्यासमोर येतो. पण तो गावात आल्याचे कळताच त्याचा काका स्वतः त्याला घरी घेऊन जातो. तो काकाच्या घरी पोहचल्याबरोबर त्याच्या लहानग्या चुलत भावंडानी त्याला आनंदाने मिठ्या मारल्या. मोठ्या भावाच्या आगमनाचा त्यांना खूप आनंद झाला होता. ते त्याला सोडायला तयार नव्हते. शेवटी काकूने जेवायला बोलावल्यावर त्याची सुटका झाली. मोजमापाच्या कामात त्याला काकाने सर्व मदत केली. तलाठी कार्यालय, नायब तहसीलदार कार्यालय, भूलेख कार्यालय, तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व जेथे जेथे त्याला जावे लागे किंवा काम असे तेथे तेथे काका त्याला सोबत करी व मदतही ...